Wednesday 14 December 2011

८. बाबा आणि औषध निर्मिती




८. बाबा आणि औषध निर्मिती




बाबांनी गेल्या अनेक वर्षात लोकांच्या शारीरिक व्याधीं व आरोग्याच्या गरजांवर इलाज करण्याकरता अनेकदा औषधोपचार केलेले आहेत. विशेषतः नागीण किंवा हर्पीस आणि सध्या कॅन्सर किंवा कर्करोगाच्या केसेस त्यांनी अदभूतपणे बऱ्या केल्याचे अनेक दाखले देशातील भागातील त्यांचे विविध शिष्यगण देतात. बाबा रुढार्थाने डॉक्टरकीची परीक्षा दिलेले नाहीत पण त्यांना त्यांच्या गुरूंचा म्हणजे नवनाथांपैकी बाबा जालंधर महाराजांचा आदेश वेळोवेळी मिळतो. त्याप्रमाणे ते त्या आदेशानुसार औषधे तयार करतात. ते औषध तयार करताना ते स्वतः त्या पदार्थांचे कापून तुकडे करून, पाटा-वरवंटा घेऊन वाटून-घाटून, अनेकदा त्याचा लेप, काढा करण्याच्या कामाला स्वतः झोकुन देतात. अर्थात त्यात त्यांच्या पत्नीची त्यांना अत्यंत मोलाची मदत होते पण बाबांना सर्व तंत्रे सांभाळून त्यांच्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे ते औषध तयार करण्याचे जिकीरीचे, कष्टाचे काम कौशल्याने करावे लागते. या सर्वासाठी ते पैसे घेत नाहीत. कधी कधी सुवर्ण भस्म, पारा तत्सम किंमती गोष्टीचा वापर करायची गरज पडल्यास त्याचा खर्च बाबा त्या व्यक्तीला आधी सांगून करतात. तो द्यावा लागतो. औषधे बनवून ज्यांना देतात त्यांनी त्यानंतर ते औषध घेतल्यावर बाबांचे त्यांच्यावर शेवटपर्यंत लक्ष असते. आता मोबाईल - फोनमुळे बाबा त्यांचा हालहवाल आपणहून फोनने विचारताना अनेक जणांनी त्यांना पाहिले आहे. काहींना कधी कधी वाटते की कशाला बाबांना त्रास द्यावा. आपण तर बरे झालोय. जाऊ दे. बोलू भेटल्यावर, पण बाबांना ते चालत नाही. तेंव्हा आपली तब्बेत सुधारत असल्याची बातमी बाबांना तत्परतेने सांगणे गरजेचे आहे.
------------------------------------------------------------------------------------------

६. बाबा आणि भिशी७. बाबा आणि काही पडीक मंडळी

६. बाबा आणि भिशी

बाबांचा आणखी एक आवडता शौक म्हणजे भिशी. व्यापारी वर्गाशिवाय कोणालाही सामिल करुन न घेणारे भिशिचे मंडळ बाबांना आवर्जून निंमंत्रण देते. बाबांनी आजवर अनेक भिशांतून साधारण २० टक्क्यांपेक्षा जास्त व्याज दराने उत्पन्न मिळवून लाखोरुपयांची उलाढाल केलेली आहे. अनेकांना तात्काळ मोठ्या रक्कमेच्या पैशांची सोय करायला अशा भिशीतून त्यांना सहज शक्य होत असावे.

७. बाबा आणि काही पडीक मंडळी

बाबांच्या घरी भेटायला गेले की काही मंडळी हमखास भेटतात. ते आपल्या काही विवंचनांमुळे बाबांच्या आसपास घुटमळत राहण्यात आनंद मानतात आणि बाबा कधी कधी वैतागाने सुद्धा, जा तुझे काम होईल असे म्हटल्यावर मगच तेथून आनंदाने निघतात.

-------------------------------------------------------------------------------------------

५. बाबा आणि कुत्र्यांचा शौक

५. बाबा आणि कुत्र्यांचा शौक

काही वर्षांपुर्वी एक पांढऱ्या रंगाचे कुत्रे दर गुरुवारी आरतीच्या वेळी फाटकापाशी व नंतर दरवाज्यापाशी येऊन आत वाकून पहात रखवाली करताना व आवर्जून प्रसाद भक्षण करताना आम्हा शिष्यांनी कित्येकदा पाहिलेले आहे. काही काळानंतर त्याच्या ऐवजी बाबांना घरात एक कुत्रे असावे असे वाटून एक काळ्या रंगाचे छोटेसे पिल्लू आणले. म्हणजे काय त्यांच्या एका शिष्यानी ते आणून दिले होते. तिचे नाव राणी ठेवण्यात आले. राणी घरभर खेळू लागली. विधी करून आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवू लागली. पण बाबांनी तिचे लाड करून तिला राणीसारखी ठेवण्यात कमी केले नाही. नंतर आली ती नाईट. ती ही रंगाने काळी. पण स्वभावाने तिखट. तिने दंगा करून भंडावले. आणि मग तिला साखळीने बांधायची वेळ येऊ लागल्याने तिची रवानगी कुठे तरी केली गेली.

४. बाबा आणि दश्शी पकड





४. बाबा आणि दश्शी पकड



बाबा हवाईदलात असल्यापासून त्यांना पत्ते खेळायचा शौक जडला होता. विशेषतः एस एन सी ओज् मेस मधे म्हणजे वरिष्ट जेसीओजच्या मेस मधे रमी किंवा पपलूचा अड्डा जमत असे. विशेषत ते नाईन बीआरडीच्या शेवटच्या पोस्टींगला आले असताना. निवृत्तीनंतर बाबांचे रमी वगैरे खेळायचे प्रमाण कमी झाले. काही तरुण शिष्यांना दश्शी पकड नावाचा नवा रंजक व विचारकरून खेळायला लावणारा डाव त्यांनी शिकवला व खेळायला प्रेरित केले. चारजणांचा खेळ. समोरासमोरचे भिडू. पत्ते वाटल्यावर चारही दश्श्या आपल्याजवळ ठेवण्याची हुशारी व कसब वाटलेल्या पानातून दाखवायचे असते. समोरच्या भिडूंच्या पानांचा अंदाज व खेळणाऱ्यांचा वकूब यावर दश्शी पकड रंगते. साधारणतः गुरुवारच्या साप्ताहिक पुजेनंतर दहाच्या सुमाराला रेंगाळणाऱ्यांना कटवून बाबांचा पत्याचा डाव मांडायला सुरवात होते. पुढे मेंढी-कोट करत करत दोन - तीन तास कसे जातात ते कळत नाहीत. बरं बाबांच्या समोरचा भिडू म्हणून खेळायला बसणे ही एक प्रकारची कसोटी असते. कारण तो डाव संपला की समोरच्याने केलेल्या चुकांची रीतसर कान उघाडणी बाबा संयमाने पण स्पष्टपणे करतात. त्यावेळी कधी कधी कुठून खेळायला बसलो असे वाटत असावे. पैसे लाऊन खेळायपेक्षा निपद्रवी पण रंजक मनोरंजनाचा बाबांना मोठा विरंगुळा आहे. त्याच्या या खेळांमधील भिडू आपापल्या आठवणी सांगतील म्हणून येथे इतकेच.


३. बाबा आणि बुद्धिबळ


३. बाबा आणि बुद्धिबळ


साधारण संध्याकाळी बाबांना भेटता येत नाही. कारण चार-पाचच्या सुमाराला वामकुक्षी नंतर बाबा पट मांडून बुद्धिबळ खेळायला त्यांच्या नेहमीच्या आसनावर म्हणजेच हवाईदलात असताना ते पोस्टिंगला उपयोगी पडणाऱ्या लाकडी बॉक्सच्या दिवाणावर मांडी ठोकून सिद्ध असतात. त्यांना पटावरच्या सोंगट्या पटकन मारून खेळ उगीच झटपट संपवणारा खेळाडू आवडत नाही. फाईट टफ द्यावी लागते. पण शेवटी पटावरील बाबांचा राजा केंव्हा, कसा जिंकेल याची चतुर दक्षता त्यांच्या समोर बसलेल्या शिष्य गणांना घ्यावी लागते. कारण कधी कधी समोरच्याचा राजा जिंकला तर पटावर पुन्हा काळ्या-पांढऱ्या सोंगट्या आपापल्या जागेवर जाऊन नव्या खेळीला सुरवात होते.