Friday 11 February 2022

ओक कुटुंबियांचे अनुभव

पुज्य चितळेबाबांसमावेत शशिकांत आणि मागे चिन्मय ओक

ओक कुटुंबियाचे अनुभव

संकलन शशिकांत ओक Mo: 9881901049. Email:shashioak@gmail.com

आमचा चितळे बाबांशी संबंध गेल्या १०-१२ वर्षापूर्वीपासूनचा. परिचय झाला. स्नेहाचे संबंध झाले. घरोबा वाढला. वेळोवेळी बाबांनी दिलेल्या आशीर्वादाने, सल्ल्याने, घरगुती, वैय़क्तिक समस्यांवर मात करता आली. दिवसे दिवस श्रद्धा व आदर वाढत गेला. आमच्या संबंधी घडलेले काही प्रसंग, किस्से सादर करत आहे.

पुज्य चितळेबाबा

आमच्या कुटुंबाचा म्हणजे सौ. अलका, मुलगा चिन्मय, मुलगी नेहा व मी, हवाईदलातील निवृत्त विंग कमांडर शशिकांत ओक, असा सर्वांचा परिचय नवा असे जरी म्हणालो तरी माझी व बाबांची ओळख खुप जुनी १९७६च्या कानपूरच्या पोस्टींग पासूनची. गणेशपूजेच्या काळात बाबा त्यावेळी गणेशपुजेची आरास करण्यात व नाटकाच्या स्टेज निर्मितीच्या धामधुमीतले बॅक स्टेजचे महत्वाचे सहकारी. त्यांच्या चैतन्यदायक उपस्थितीमुळे बळाची व कष्टाची कामे सुसह्य होत. मी त्या काळात नाटकाच्या प्रॅक्टीसमधे गुंतलेला असे. मधल्यावेळेत गरमागरम चहाचे घुटके घेता घेता गप्पा रंगत. त्यात बाबांचा सहभाग असे. त्या काळात ते हवाईदलातील लोकात भूतनाथम्हणून प्रसिद्ध होते. मात्र त्यावेळी त्यांच्या अलौकिक शक्तीची माहिती मला नव्हती.

बऱ्याच वर्षानंतर १९९७ साली एकदा लेहच्या ऑफिसर्स मेसमधे विंग कमांडर संजय वझेशी परिचय झाला. त्य़ाच्या कडून बाबांच्या सामर्थ्याची महती कळली. त्यानंतर १९९८ मधे पुण्याला पोस्टींगवर आल्यावर रीतसर भेट घेतली तेंव्हा पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला.

चि. चिन्मयचा अध्यात्मिक विषयांकडे जात्याच ओढा. आमच्या बरोबर त्याचीही ओशो वाङमयाची कॅसेटची, पारायणे घडली. ओशो आश्रमात जाऊन सक्रीय ध्यान व अन्य ध्यान पद्धतींचा त्याने सराव केला. पुढे बाबांच्या प्रेरणेने गुरुदीक्षा घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान धारणेला सुरवात केली. सुरवातीच्या काळातच त्याने प्रगती छान दाखवली. ग्रहण काळात बाबांसमावेत छातीभर पाण्यात उभे राहून कडक तप केले. गुरुवारच्या पूजेस न चुकता उपस्थित राहून तर कधी तर कधी पत्यांच्या रंगदार दश्शी पकड खेळात बाबांसमावेत विरंगुळ्यात तो समाविष्ट होतो.

मीही बाबांकडे शनिवारी सकाळी ध्यानाला जात असे. - बैठकीत ध्यानातून माझे विमान अंतरिक्षात अतिदूर गेल्याचे बाबांनी ध्यानाने ताडले व अंतरिक्षात भ्रमण करणारा माझा मानसिक पतंग वेळेवर खाली ओढून आणला. पुढे कै. हिंगमिरे यांच्या आकस्मिक निधनाचे निमित्त होऊन माझी साधना खंडित झाली. ती पुन्हा सुरू झालीच नाही. असो.

पत्नी सौ. अलकाच्या प्रेमळ आग्रहाखातर बाबा सौ वहिनींच्या समवेत एकदा लोणावळा तर नंतर श्री. हिराभाई बुटालांच्या चि. कौस्तुभच्या विवाहानिमित्ताने कोकण ट्रिप झाली. बाबांचा मनमोकळा स्वभाव, नेहा, चिन्मयची त्यांच्यावरची अटळ श्रद्धा, हवाईदलातील प्रदीर्घ अनुभवाचा संगम यामुळे त्यांचा सहवास आम्हा सर्वांना हवाहवासा वाटतो. सौ. वहिनीना ही सौ. अलकासमावेत मनमोकळ्या गप्पात समावताना सहल केंव्हा संपली कळत नसे.

१९९८ साली पितृश्राद्ध करण्याचा त्यांचा सल्ला व सहभाग आम्ही अमलात आणला. त्यानंतर एका ऑटो रायटिंग मधील संदेशाद्वारे स्वर्गीय वडिलांनी श्राद्ध कार्यातून केलेले तर्पण मला पोचले असे आल्यावर बाबांनी करवलेल्या श्राद्धाचे महत्व मला कळले. चि. नेहासाठी मघा नक्षत्र शांती करण्याचा आदेश मिळाल्यावर ती शांती केली अन लगेच नेहाला सुयोग्य वर मिळाला. चि. चिन्मयच्या विवाहाला होणाऱ्या विलंबाचे कारण जालंधर नाथबाबांनी नाग दोष असे सांगितले होते. २००८ साली चि चिन्मयच्या नागपीडा शांतीच्या हवनानंतर त्यांना लागलेल्या ध्यानातून त्यांनी माझ्या वडिलांचा नागलोकातील वासातून घडलेल्या सुटकेचा आश्चर्यकारक उल्लेख केला व विलंबाचे कारण शोधले.