Friday 16 December 2016

श्रीपादश्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत रसग्रहण प्रस्तावना

श्रीपादश्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत
IMG_20161215_205948~2.jpg
रसग्रहण

प्रस्तावना

शंकर भट्ट नामक एक स्मार्त {शैव आणि वैष्णव दोन्हीही पंथ मानणारे हिंदू} कानडी ब्राह्मण उडूपीहून कन्या  कुमारीचे दर्शन घ्यायला पोहोचले. तिथे त्यांना आदेश मिळाला, 'तू कुरवपुरात श्रीपादश्रीवल्लभ (सन १३२० ते १३५०) यांचे दर्शन घे, त्यांच्या दर्शनाने तुझ्या आत्म्याला, मनाला, अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती होईल. ती दैवी आज्ञा घेऊन नेमके कुठे जायचे हे माहित नसलेल्या पायी प्रवासाला (सन १३३६) ते लागले. असा हा प्रवासवर्णनातून पुढे जाता जाता चरित्र कथन करणारा अनोखा ग्रंथ आहे. वाटेत भेटलेल्या व्यक्तींच्या माहिती व मार्गदर्शनामधून ते पुढे जात राहतात. अध्याय १८ मध्ये त्यांची श्रींशी प्रत्यक्ष भेट होते. त्या आधीच्या अध्यायात श्रीपादश्रीवल्लभ यांच्यात बाललीलांमधून त्यांच्या अद्भुत जीवनाची, अफाट ज्ञानसंपदेची आणि अचाट कर्तृत्वाची महती कळते. शंकर भट्ट अध्याय ५२ पर्यंत ते त्यांच्या बरोबर राहतात. श्रींच्या आज्ञेनुसार श्रींनी कृष्णानदीत गुप्त होऊन गेल्यावर ३ वर्षे ते कुरवपुरात राहून नंतर निघून जातात. पुढे त्यांनी काय केले, मृत्यू कसा आला, याबद्दल अधिक माहिती या ग्रंथात मिळत नाही. हा संस्कृत ग्रंथ नंतर १९८७ साल पर्यंत म्हणजे ६३७ वर्षे श्रींच्या मामांच्या घरातील जागेत खूप खोलवर जपून ठेवला गेला आणि आदेशाप्रमाणे अंधारात राहिला. पुर्व कथनानुसार श्रींच्या ३३व्या पिढीतील भीमावरम येथे वास्तव्यास असलेल्या  मल्लादि गोविंद दीक्षित यांच्याकडे अचानक गाणगापुर देवस्थानाकडून अचानक प्रसाद आला. तेंव्हा गोविंद दीक्षित यांना परंपरेने माहित झालेल्या कथनाची आठवण होऊन खोलवर गाडून सुरक्षित ठेवलेल्या त्या जीर्ण ग्रंथाला बाहेर काढून दक्षतापूर्वक नवी प्रत तयार करून संस्कृतमधील जुनी प्रत आदेशानुसार विजयवाटिका (विजयवाड़ा) येथे कृष्णा नदीत विसर्जित करण्यात आली. पुढे या तेलगु मधे भाषांतरित ग्रंथाचे अनेक भाषात प्रकाशन झाले.  हैद्राबादच्या ह. भ. प.  निठूरकर यांनी मराठीत भाषांतर करून तो २००७ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर पीठिकापुरात (पीठापूर) संत गोपाल बाबांच्या (निर्वाण 20 नोव्हेंबर 2016) निर्देशानुसार सामान्यांना परवडेल अशा १०० रुपयात सुमतीनंदन पब्लिकेशन्स ट्रस्टतर्फे श्रीपादवल्लभ संपूर्ण चरित्रामृत या शीर्षकाखाली प्रकाशित प्रत माझ्या हातात आली.
हा ग्रन्थ निठूरकरांनी भाषांतरित पोथीपेक्षा जास्त माहितीपूर्ण वाटतो. तथापि दोन्हीही ग्रंथ अक्षरसत्य आहेत. संकल्प पूर्वक केले तर प्रचीती देणारे, समाधान देणारे ठरेल असा श्रींनी आशीर्वाद देऊन वाचकांना शब्द दिला आहे. गुरूचरित्र ही पोथी काही शतकांपासून मराठी वाचकांचे श्रद्धास्थान आहे. दत्त संप्रदायातील तीन अवतारातील मधले श्री नरसिंह सरस्वती (सन १३७८ ते १४५८) व त्यांच्या नंतर अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ (सन १८५६ ते १८७८ अक्कलकोट वास्तव्य ) हे पुर्णावतार मानतात.
श्रीपादश्रीवल्लभ यांचे त्रोटक चरित्र गुरूचरित्रात समाविष्ट आहे. श्रीपादश्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात कालांतराने होणाऱ्या त्यांच्या अवतार कार्याचे निर्देश येतात शिवाय त्यांच्या संदर्भात येणाऱ्या अन्य व्यक्ती पुन्हा कोण कोणत्या रूपाने जन्म घेतील याचा प्रत्यक्ष पुरावा त्या त्या मान्यवर विभूती जन्मून गेल्यामुळे मनावर ठसतो. गुरूचरित्रात अनेक उपकथातून समाजाला हितकारक उपदेश मिळतो. कालांतराने मलीन झालेल्या कर्मकांडांची उजळणी त्यात समावेशित आहे. ओवी बद्ध काव्य रचनेने नटलेल्या  पोथीत बोजडपणा जाणवतो. श्रीपादश्रीवल्लभ चरित्रामृत  पोथीपेक्षा ग्रंथ म्हणणे मला समर्पक वाटते. ते काव्यमय नसून साध्या मराठीतून वाचायला सोपे जाते. अध्याय ३ वर कणाद महर्षींच्या कण सिद्धांत म्हणून वर्णलेले कथन आधुनिक विज्ञानाच्या कक्षातील अॅटम व क्वांटम सिद्धांताला प्रतिपादन करत आहेत असे जाणवते. बाल्यावस्थेतील श्रींना, 'तू कोण? मोक्ष म्हणजे काय? तूच जर सर्व परब्रह्म रूप आहेस तर जीव सुख दु:ख का भोगतो? ज्योतिष शास्त्राप्रमाणे भविष्य नेहमीच खरे येते का? वर्तवलेले भविष्य बदलू शकते का? 'अशा नेहमी गोंधळात टाकणार्‍या प्रश्नांची समर्पक उत्तरे आधुनिक विचारधारेला बळकटी आणतात. म्हणून कडक सोवळ्यातून मुक्त वाटतो.
या ग्रंथात ताडपत्रावरील नाडीग्रंथ कथनाचा पुरावा मिळतो. शंकर भट्टाची विचित्र कचाट्यातून सुटवणूक जंगम नाडीवाचक  कवड्या टाकून मिळवलेल्या भविष्य वाणीने होते. अन्य अध्यायात नाडी शास्त्रातील कथनामुळे घटनांचा अन्वयार्थ काढायला, मान्यता मिळायला शक्य होते.
अनेक प्रसंगात पात्रांच्या एकातून एक कथन पद्धतीतून स्थान कुठे, कोणाचा कोण? अशी गुंतागुंत होते. ती कमी व्हावी. सन १३५० च्या सुमारास निर्देशित खेडी, गावे, नद्या, पवित्र मंदिरे यांचे आजही अस्तित्व आहे का? असेल तर ते नकाशावर कसे दिसते याचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर करायचा प्रयास केला आहे. विविध कथनातून त्या काळातील समाजरचनेचा कानोसा मिळतो. अध्याय ४६ मध्ये चिथावणीखोर लोकांमुळे गावकरी  श्रींचे नातलग, चाहते यांना वाळीत टाकले जाण्याइतपत संबंध ताणतात. त्यामुळे तेंव्हाही श्रींना जादूटोणा करणारा असा लोकापवाद सहन करावा लागला होता. हे समजून येते.
ग्रंथ पारायणात सलग वाचत राहायला लागते. त्या व्यतिरिक्त हे लिखाण जवळ ठेवून वाचताना विविध संदर्भांची माहिती हाताशी असण्याची सोय व्हावी म्हणून सादर केले आहे.

पुढील भाग…


श्रींचा जन्म पीठिकापुरम किंवा सध्याच्या आंध्र प्रदेशातील पीठापूरला झाला. ( A) नंतर ते कुरवपुरला अवतारकार्याच्या सिद्धिसाठी राहिले  (B) याचा भौगोलिक अंदाज दर्शवणारा नकाशा. निळ्या रंगातील मार्ग फक्त पायी जायचे असेल तर त्याकाळात कसे जायला लागले असते हे समजण्यासाठी दर्शवला गेला आहे. याच मार्गाने त्यांचे गमन झाले असा दावा नाही.
अध्याय परत्वे कथा, नकाशा व अन्य माहिती देणार आहे...
ज्ञानसागरातील मोती यामधून काही विशेष विषयावर माहिती सादर केली आहे. त्रुटी अर्थात माझ्या. या माहितीत भर घातली जावी. नकाशावर न सापडलेल्या स्थानांचा शोध जिज्ञासूंनी घ्यावा ही विनंती.

शशिकांत ओक.