Wednesday 14 December 2011

1. बाबा आणि त्यांच्या पत्नी - सौभाग्यवती स्मिता.


१. बाबा आणि त्यांच्या पत्नी - सौभाग्यवती स्मिता.



अहो तुम्ही प्रत्येक जण बाबांच्याशी आपली दुःखे, शारीरिक आजार, मानसिक क्लेष कथन करता आणि बाबा त्यांच्यावर चुटकीसरशी इलाज करतात. पण एक 8-10 जणांचे घर चालणारी गृहिणी आणि आता मुलांबरोबर त्यांच्या मुलांची आजी म्हणून मला घर निस्तरता निस्तरता नाकी नऊ येतात. बाबांना वेळोवेळी चहाची तलफ येते. त्यांच्याबरोबर त्यावेळी उपस्थित असलेल्यांचा चहा करणे एक कसरत असते.

बाबांना भेटायला येणाऱ्या कुटुंबियांपैकी स्त्रिया काय म्हणताय वैनी?’ म्हणून आतवर येतात मग तेंव्हा नातवंडांनी निर्माण केलेल्या पसाऱ्यातून त्यांचे हसून, गोड बोलून आपलेपणाने स्वागत करावे लागते. विवाहानंतर मला बाबांचा मनस्वी, पण सेवाभावी स्वभाव कळून आला. कोणाचे काही वावगे खपवून घेणार नाही असा कडक स्वभाव, त्यामुळे चटकन चढणारा पारा. सदैव मारामारीला सज्ज. त्यात अत्यंत तोकड्या पैशांच्या आवक. मोठे कुटुंब. देशातील विविध भागात झालेल्या पोस्टींगमुळे कधी अती गर्मीत बिना फॅनचे, तर कधी अती पावसाच्या भागात गळक्या क्वार्टरची सोयरिक. तोकड्या दीड-दोन खोल्यात चार मुलांना घेऊन केलेला संसार. पुढे मुली मुलांचे शिक्षण, नंतर विवाह संबंध. त्या सर्वांची मने राखण्याच्या दिव्यातून जावे लागते. नोकरदार सुनांमुलांमुळे त्यांची होणारी दमणूक, वाढत्या वयात नातवंडाच्या मागे राहून त्यांची काळजी घेणे वगैरे करत करत दिवस कसा जातो कळत नाही. बाबांच्या भाषेत त्यांची मुले त्यांचापेक्षा सवाई तर त्यांची नातवंडे, मुलांच्या दोन पावले पुढे असा सगळा प्रकार आहे. बाबा म्हणतात, तिसरी पिढी जास्त डोकेबाज व चौकस झाली आहे.

आमच्या नवनाथ निवास बंगल्यामधील पुजारूम आणि बाबांना भेटायच्या हॉलमधे आल्या गेल्यांची वर्दळ घरच्यांना सहन करावी लागते. आपापल्या उरलेल्या खोल्यात राहताना घरच्यांना नोकरी व्यवसायातील ताणतणाव सहन करून आनंदाने राहावे लागते.

मी माझा चहा विक्रीचे काम चालू ठेवते. तोच माझा विरंगुळा. दत्त जयंती व गुरूपौर्णिमा आम्ही दरवर्षी उत्साहाने साजरी करतो. त्यावेळी देशातील विविध भागातून अनेक शिष्यगण आवर्जून येतात. शेकड्यांनी त्यावेळी भंडारा करावा लागतो. तेंव्हा घरच्यांशिवाय ठाकूर कुटुंबियांची फार मदत होते. शिवाय हरएक कामाला तरुण दिवसभर दिमतीला हजर असतात. खरोखरच आमच्यावर बाबा जालंघर, दुर्गामातेची आणि अन्य नाथांची कृपादृष्टी आहे म्हणून मला मानसिक विवंचना असूनही सात्विक समाधान वाटते.

बाबा एक औलिया माणूस म्हणून त्यांचे नाव आहे त्यांनी निस्वार्थीपणे सुरू ठेवलेल्या या सेवेत माझा छोटासा का होईना वाटा असल्याचे मला समाधान आहे आणि या पुढे ही राहील.-

1 comment:

  1. खरोखर आपल्या कष्टांना तोड नाही

    ReplyDelete