Wednesday 14 December 2011

नाडी ग्रंथांच्या शोधात हिमालय यात्रा - 2

.... मी अंबाल्याहून निघून हरिद्वारला टाटा सुमोत बसलो. ऋषिकेशच्या वाटेवर गाडी लागली. मागच्या ८-१० दिवसातील घटनांची उजळणी करू लागलो. ऑफिसच्या कामाचा बोजा पाहून मी नाही नाही म्हणत असताना अचानक मला अंबाल्याला कामाला जबरदस्ती पाठवले गेले. शिवाय वर ते काम उरकल्यावर एरव्ही नाना विघ्ने करून हैराण करणाऱ्या माझ्या वरिष्ठांनी काहीही कटकट न करता, ‘संक्रांतला गंगेत स्नान कर. नोकरीतून गेल्यावर इतक्या लांबवर येणे जमेलच असे नाही. जा फिरुन ये.असा आदेशदिला. तेव्हा माझे साथीदार मित्र तो आदेश ऐकून चक्रावून गेले होते. बाबांनी फोनवरून बोलल्याला ९ दिवसही पुरे झाले नव्हते आणि मी हिमालयाच्या पायथ्याशी नाडी ग्रंथांच्या पट्ट्यांच्या शोधात फिरायला निघालो होतो! सर्व अद्भुतच घडत होते. मनांत मी म्हणत होतो, ‘ही फक्त सुरवात आहे’.

वाटेत इतरांशी बोलताना कळले की गोपेश्वरला जाऊन तेथून चोपत्याला जाणे बर्फ न वितळल्याने शक्य नाही. त्या ऐवजी रुद्रप्रयागला उतरून उखीमठला जावे. तेथून चोपत्याला २५-३० किमी जीप-टॅक्सीने त्या भागातील बर्फ वितळले असेल तर एखाद वेळेला जाणे शक्य आहे. प्रयत्न करुन पहावा. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी उखीमठच्या बसमधे चढलो. वाटेत अगस्त्यमुनी आश्रम, कुंडकरन करत उखीमठला ११ वाजता पोचलो. कोणाला पुढील वाट विचारावी असे म्हणत असताना कपाळाला गंध लावलेले एक सद्गृहस्थ भेटले. ते होते सच्चिदानंद मैठाणी. तिथल्या दुकानाचे, हॉटेलाचे मालक. तो दिवस रविवार होता. त्यांना सुट्टी होती. त्यांनी जारनी वा डोरनी-दारणी-झीरनी या तऱ्हेच्या नावाचे गाव या भागात नसल्याचे सांगितले. माझी निराशा झालेली पाहून ते म्हणाले, "तुम्हाला एकांकडे नेतो. त्यांना या भागातील सर्व गावांतील शिवमंदिरांची व पुजाऱ्यांची नावे माहीत आहेत. ते तुम्हाला मक्कूमठयेथे भेटतील."

त्यांच्या घर कम हॉटेलात भरपूर भात व उसळ खाऊन त्यांनी ठरवलेल्या जीपने निघालो. दीड-दोन तासांच्या घाटाच्या प्रवासात हिमालयाच्या शिवलिंग, गंगोत्री, बंदरपूँछ अशा अनेक शिखरांचे दर्शन होत होते.

Figure 3 मक्कूमठाच्य़ा वाटेवर


वाट फारच धोकादायक होती. शेवटचे ३ किमी रस्ता फारच खराब होता. मध्येच वाळून घट्ट झालेले बर्फाचे ढीग फोडून काढण्याचे, सपाट करण्याचे काम चालले होते. त्यातून जीप जाताना चाके कधी घसरत होती, तर कधी तेथल्या तेथे फिरत होती. करत-करत मक्कूमठ या गावात पोहोचलो. मक्कूमठ म्हणजे चोपत्याच्या वाटेवर १०-१५ किमी अलिकडे खोल घळीप्रमाणे असलेल्या डोंगरांच्या उतारावरचा छोटा कसबा होता. मक्कूमठ हे मार्कंडेय ऋषींचे स्थान मानले जाते. अतिथंडीमुळे चोपता व तुंगनाथ मंदिरांच्या परिसरातील शिवमंदिरांचे मुखवटे घेऊन पुजारी या गावात वस्तीला येतात. नंतर बर्फ वितळले की पुन्हा मंदिरांची कपाटद्वारे उघडली जातात.

गावाच्या जरा अलीकडे सच्चिदानंदांनी गाडी थांबवली. म्हणाले, "इथे केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी नंदकिशोर व महादेवप्रसाद मैठाणी राहातात. ते या भागातील मान्यवर नेते आहेत. त्यांना भेटून पाहू." त्यांनी, “रामसरन नाम का कोई व्यक्ती तुंगनाथ मंदिर के आसपास के शिवमंदिरों में पुजारी नही था, ना ही है।असे म्हणून चहा पाजून कटवले.

पुढे एका ठिकाणी मंदिरात सच्चिदानंदजी म्हणाले, "या मंदिरात काही मुली आपल्या नखात पाहून अंजनविद्येने भविष्यकथन करतात." (तिकडे या विद्येला नखीदर्पन म्हणतात) ते ही पाहून झाले. मुली अगदीच थिल्लर होत्या त्यांना कशाचेच महत्त्व कळत नव्हते. जारनी-डारनी गावाचा पत्ता लागत नव्हता. परत फिरायची वेळ झाली. शिवाय हवामानही गडगडाटाने धमकावू लागले होते. आम्ही परतलो. त्या दिवशी नंतर माझी ओळख सत्यसाईभक्त सर्वेश्वर दत्त सेमवाल यांच्याशी झाली. त्यांनी रात्री राहायला आग्रहाने ठेऊन घेतले. काही लोकांशी त्यांनी संपर्क केल्यावर असे कळले की जारनी किंवा डारनी असे नाही. परंतु टिरणी नावाचे एक गावकसबा आहे. त्या ठिकाणी महेशानंद मैठाणी नावाचे एक खूप वृद्ध पुजारी आहेत. त्यांच्याकडे भविष्य ऐकायला अनेकजण येतात. सत्यसाई भक्त सेमवालांनाही आठवले की खूप वर्षापूर्वी त्यांनी वडिलांबरोबर त्यांच्याकडील पट्ट्यावरील भविष्यकथन करताना पाहिले होते.





No comments:

Post a Comment