Wednesday 14 December 2011

महर्षी अत्रींचा जीव नाडीतून कृपा आशीर्वाद

महर्षी अत्रींचा जीव नाडीतून कृपा आशीर्वाद

सन २००८च्या मे महिन्यात एकदा बाबा म्हणाले, ‘मला जालंधरबाबांचा आदेश आला आहे की अत्री जीव नाडीतून महर्षींचा आशीर्वाद घ्यावा. तेंव्हा सोय करा. मी सोईचा दिवस ठरवला. दुपारी ४ पर्यंत केंद्रात पोचलो. आधी आलेल्यांचे काम संपेपर्यंत सुर्यास्ताची वेळ अगदी जवळ आली. तेंव्हा आमचा नंबर लागला. पिवळ्या रेशमी वस्त्रातून गुंडाळलेल्या पट्ट्य़ा बाहेर आल्या. १२ कवड्यांचे दान पडले. विचारा काय प्रश्न आहे ते. बाबा म्हणाले, ‘महर्षींचा आशीर्वाद मिळावा. पट्टीतून पाहून वाचून दाखवले गेले की माझ्या गोत्रातील एक ज्ञानी व्यक्तीने आशीर्वाद मागितला आहे. (बाबांचे गोत्र अत्री आहे) शिवाय त्याच्या सोबत माझ्यावर प्रेम करणारा एक शेजारी बसला आहे. (शशिकांत ओक) त्या दोघांना माझे आशीर्वाद. आता पाखरे घरट्याकडे परतायला लागली आहेत. त्यामुळे आजचे कथन थांबत आहे. शुभम. अतिशय मोजक्या शब्दात पण प्रखर आशीर्वाद आम्हाला मिळाल्याचे समाधान होते तर फारच कमी वेळाची भेट झाली अशी मला रुखरुख होती.

मात्र दि. १८ जुलैच्या गुरुपौर्णिमेला त्याची कसर भरून निघाली असे म्हणावे लागेल. त्याचे असे झाले की दर पौर्णिमेला अत्री व अगस्त्य महर्षींना दीप व फुले वाहण्याचे कार्य मी करत आलो आहे. तसाच त्यादिवशी गेलो होतो. कवड्यांचे दान पडले. अत्री महर्षी म्हणाले, ‘आज गुरुपौर्णिमेचा दिवस. त्यात शुक्रवार. तो शक्तीमातेचा. म्हणून आज शिव आणि पार्वती अर्धनारी नटराजाच्या मुद्रेत असून तुला आशीर्वाद देत आहेत. या पुढील काळात तुझ्याकडून होणाऱ्या मंगलकार्याला आमचे शुभाशीर्वाद आहेत. मी, अत्री व माझी पत्नी अनुसूया, आम्ही तुला या निमित्त असे सांगतो की नुकतेच तुझ्या मुलीच्या विवाहाचे संबंध ठरत आहेत. तिच्या व नंतर पुत्राच्या विवाहासाठी व नंतरच्या विवाहो्त्तर जीवनातील सुखासमाधानासाठी आमचे उभयतांचे आशीर्वाद. आज ओंम अर्धनारी नटराजाय नमः असा जप करावा’ (ता.क.- त्यात म्हटल्याप्रमाणे - चि नेहाचा ५ फेब्रूवारी व नंतर १ मार्च २००९ ला चिन्मयचा विवाह साजरा झाला).

या शिवाय मी असा आदेश देतो, महर्षींची जी वस्तू तुझ्याकडे आहे ती तू तुझ्या गुरूंच्या पायाशी अर्पण कर. ‘ती रात्रभर तिथे ठेव. त्यांचा आशीर्वाद घे. त्यातून योग्य ते घडण्यास चालना मिळेल. त्याप्रमाणे मी बाबांच्या चरणांवर नाडी भविष्याच्या काही पट्यांचे पुडके त्यांच्या पावलांना हळद कुंकू लावून अर्पण केले. त्यानंतर त्याच दिवशी १८ जुलै २००८ला हे लिखाण करायची उर्मी आली. तीही त्यांना समर्पण.

No comments:

Post a Comment