Thursday 27 July 2017

ज्ञान सागरातील मोती - श्रीपाद श्रीवल्लभ लीला वैभव ग्रंथातून...


ज्ञान सागरातील मोती
कथनातून विविध विषयांची माहिती व उपदेश
प्रश्न - "दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा " या नामजपाचा अर्थ काय
(अ. 16 पान 148)
उत्तर : दिगंबर म्हणजे वस्त्रहीन हा अर्थ इथे अभिप्रेत नाही. दिक् म्हणजे दिशा किंवा सीमा. ८ दिशांना आपण आकाशाच्या सीमा मानतो. इथे अशा सीमा नसलेल्या अंबराचे सर्वत्र व्यापलेले तत्व असलेल्या जगतगुरूंचे आपण त्रिवार उच्चारण करतो.

... 
प्रश्न : मानवी बुद्धिचे तत्व काय? ती किती प्रकारची असते? ( अ. 16 पान 143
उत्तर : श्रीपादवल्लभ म्हणाले, 'मानवाच्या बुद्धी विकासानुसार त्याच्या जीवनाचे सार्थक होते. ही सात प्रकारची असते.
१. जिज्ञासा किंवा पंड बुद्धी : विषय लक्षात घेऊन वा ऐकून त्यावर गप्प न बसता त्या विषयाचे तत्व पूर्णपणे जाणण्याचा प्रयत्न करणार्‍या बुद्धीला पंड किंवा संकल्प बुद्धी देखील म्हणतात. यात त्या विषयाबद्दल तळमळ आणि आसक्ती लागते.
२. मेधा : काही लोक ऐकलेले जसेच्या तसे ग्रहण करून स्मरणात ठेवतात. हिला स्मरण शक्ति असे म्हणतात. मेधाशक्तीचे सामर्थ्य चेहर्‍यावरील तेजाने स्पष्ट दिसते. विश्वा​तील​कल्याणासाठी महान कार्ये घडतात. त्यामुळे किर्ती, प्रतिष्ठा, प्राप्ती होते.
३. चार्वि : कल्पना करण्याच्या निपुणतेला चार्वि बुद्धी म्हणतात. आधुनिक वैज्ञानिक शोध, विभिन्न वाङ्मय प्रकारे कार्य यातून घडते. अहंकारामुळे, दुरुपयोग करून पतनास ही कारणीभूत होते.
४. चत्व : विषयावरील तपशील जाणून, ऐकून घेण्याची उत्सुकता, असलेली चिकाटी बाळगणारी बुद्धी. ज्यांना चिकाटी नसते ते सुरवातीला सांगितलेले ऐकून विचारात पडतात. नंतर शेवटचा शब्द ऐकून दचकून विचाराच्या बाहेर येतात. स्वतः विचारात पडल्याने गुरूंनी काय सांगितले ते ऐकूच आलेले नसते. मग आजुबाजुला शिष्यांना विचारतात. 
५. गृहीति : गृहीति म्हणजे ग्रहण बुद्धी. यात ऐकलेल्या मुद्दयांचे ग्रहण करणे व त्या विषयात आपली भावना जोडून यथार्थ समजणे. यात शास्त्र वाक्ये चांगली अवगत होतात. अशा व्यक्ती समाजाचे, देशाचे भले करतात. 
६. श्रौति: गुरूची सेवा करताना सहनशीलता बाळगणारी बुद्धी. ही समोरच्याला जोडणारी सहनबुद्धी आहे. संपत्ति, विद्या, उच्चपद सहनशक्ती कमी पडल्यामुळे व्यर्थ जाते.
७. प्रतिभा : वरील सहा भागांच्या प्रकाशालाच प्रतिभा म्हणतात. वाक्चातुर्य, सत्यवचन ऐकणाऱ्याला शंका होण्याची संधी न देता विषयाबाबत सोदाहरण सांगण्याच्या बुद्धीला प्रतिभावंत म्हणतात. 
.... 
प्रश्न  : "निरंतर स्मरण करणाऱ्यांचा योगक्षेम मी पाहतो". असे गीताचार्यांचे अर्जुनाला निमित्तकरून  भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे. पण जीवनाच्या अनंत गरजांच्या गराड्यतात क्षणोक्षणी चिंतनाचे विषय बदलात. त्यात भगवत चिंतनाचे संकल्प हवेत विरून जातात. नुसतेच निरंतर चिंतन करत  राहिले तर अन्य कार्य कसे करायचे (अ.21 पान 179)
उत्तर : आपल्या मनाला दोन कामे करायची शक्ती आहे. उदाहरणाने पटकन लक्षात येईल. तुम्हाला  लग्नासाठी जायचे आहे. त्यावर विचार करत तुम्ही स्नानाला जाता. परत येऊन पाहता तर एक दागिना जागेवर दिसत नाही. शोधाशोध करूनही सापडत नाही. निराश होऊन चालणार नसते. लग्नाला तर वेळेत जायचे आहे. दागिना नंतर सावकाश शोधू. म्हणून लगेच लग्नाला पोहोचता. पण रस्त्यात, तुमचे मन कशाचा विचार करत होते? लग्नात सर्वांशी बोलता, सगळीकडे गडबडीने फिरताना, वधुवरांचे अभिनंदन करताना, नजरेने इकडे तिकडे पहाताना, कानांनी इतरांचे बोलणे ऐकताना, मनात मात्र दागिन्याचा विचार चाललेला असतो. मनात विचारांचे काहूर उठते. शोधून मिळाला तर खूप आनंद आणि नाही मिळाला तर अपार दु:ख. यावरून हे समजते की आपल्या मनाला दोन प्रकारची शक्ती असते. ज्यामुळे एका विषयावर विचार करीतच समोरची कामे सुद्धा सांभाळता येतात. दागिन्यांविषयी चिंता करीत असताना सुद्धा लग्न समारंभात सर्वांशी सुरळीत व्यवहार चाललेला असतो. मन दोन्ही कार्ये करीत असल्याचे यावरून कळते. किंमती वस्तु न दिसल्यामुळे मन त्याचे सतत चिंतन करत राहते. म्हणजे मनाला अनन्य चिंतन माहिती असल्याचे दिसते.
भगवंत रूपी अमूल्य वस्तूचे भौतिक दागिन्याबाबतच्या चिंतनासारखेच चिंतन करू शकलात तर अनन्य चिंतन होऊ शकते. दागिन्यांचे चिंतन केले तर तो दागिना मिळेल किंवा मिळणार नाही. परमेश्वराचे चिंतन करू शकल्यास तुम्ही गमावलेल्या ज्ञानासह बाह्य संपदा आदि तुम्हाला जितके द्यायचे तितके भगवंत सोय करून देतो व  दिलेल्याचे सदासर्वकाळ कवचासारखे उभे राहून रक्षण करतो. असे हे वचन आहे. याचा शोध करून सफल व्हा. हीच मानवजन्माची सार्थकता! अशा प्रकारे श्रीपादवल्लभांनी  उपस्थितांना बोध केला. 
.... 
प्रश्न : गुरूसेवा किती प्रकारे केली जाते
(अ.22 पान 183)
उत्तर : गुरूची सेवा चार प्रकारे केली जाते.
१. स्थान शुश्रूषा - आश्रम स्वच्छता.
२. अंग    शुश्रूषा - स्व शरीर पवित्र ठेवून गुरूच्या देहाची सेवा.
३. भाव. शुश्रूषा - गुरूच माता-पिता अशा परमेश्वरीय भावनेने सेवा करणे.
४. आत्म शुश्रूषा - गुरूंचा भाव जाणून वागणे.

प्रश्न : आपण सदशिष्याची लक्षणे विषद करावी. (अ.22 पान 183)
उत्तर : आता सदशिष्याची नऊ लक्षणे सांगतो.
१. अहंकार रहित, सन्मानापासून दूर राहणे.
२. निर्मत्सरत्व, मत्सररहीत असणे.
३. दक्षता, आळस नसणे.
४. निर्ममत्व. ममकाररहित.
५. गुरुसेवा परायणत्व.
६. निश्चलत्व, चंचलता नसणे.
७. परमार्थ जिज्ञासा.
८. अनसूयत्व, असूया रहित राहणे.
९. पवित्र सत्य भाषण.
... 

No comments:

Post a Comment